अरुणाचलाकडे वाटचाल व वास्तव्य
ह्या पहिल्या अध्यात्मिक अनुभूतीनंतर लवकरच महर्षींनी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी मदुराई सोडून अरुणाचलम् पर्वताच्या दिशेने वाटचाल सुरू केली. तिरुवण्णामलई गावातील अरुणाचलम् पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अरुणाचलेश्वर मंदिरात व तेथील आसपासच्या परिसरात काही काळ वास्तव्य करून ते अखेरीस अरुणाचलम् पर्वतावरील विरूपाक्ष गुहा, आम्रगुहा इत्यादि स्थानी राहू लागले. हळूहळू या स्वामींबाबत लोकांना माहिती होऊ लागली. स्वामींना भेटायला येणार्या लोकांच्या विविध प्रश्नांच्या कागदांचे कपटे श्री. गंभीरम् शेषय्या गोळा करत असत व त्यांना हे स्वामी उत्तरे देत असत. तेव्हा ते अवघे एकवीस वर्षांचे होते. श्री. शिवप्रकाशम् पिल्लई यांना ‘मी कोण आहे’ यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. इ. स. 1907 च्या सुमारास काव्यकंठ गणपतिमुनि यांना उपदेश करताना स्वामी म्हणाले, ‘‘‘मी’ हे तत्त्व जेव्हा उत्स्फूर्तपणे प्रकट होते, तेव्हा त्याचे निरीक्षण केले तर मन त्यात तल्लीन होते. हीच तल्लीनता म्हणजे खरे तप.’’
‘‘जेव्हा एखादा मंत्र पुन्हा पुन्हा जपला जातो, तेव्हा तो मंत्रध्वनी जेथून प्रकट होतो, त्या उगमस्थानावर आपले लक्ष केंद्रित केले तर मन त्यामध्ये पूर्णत: गढून जाते, हेच खरे तप.’’
ह्या सूचनांमुळे काव्यकंठांचे पूर्ण समाधान झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या जवळजवळ दोनशे शिष्यांसह स्वामींचे शिष्यत्व पत्करले व त्यांनीच या स्वामींना ‘भगवान् श्रीरमणमहर्षि असे नामाभिधान दिले
इ. स. 1911 च्या सुमारास श्री. एफ्. एच्. हम्फ्रेज् हे पोलीस खात्यातील युरोपीय अधिकारी महर्षींना भेटू लागले. अशा रीतीने देश-विदेशात महर्षींची ख्याती वाढू लागली.
