जन्म व बालपण
श्री रमण महर्षी यांचा जन्म 30 डिसेंबर 1879 रोजी पहाटे 1 वाजता झाला. पंचांगाप्रमाणे हा दिवस 16 मार्गलि, तमिळ वर्ष प्रमदि हा होता या दिवशी श्री शिवप्रभूने त्याचे भक्त गौतम व पतंजली यांना दर्शन दिले होते. त्यामुळे हा आरुद्रदर्शनाचा दिवस हिंदुस्थानात पवित्र मानला जातो.

श्री. सुंदरम् यांच्या तीन पुत्रांपैकी महर्षी हे मधले होते. श्री. सुंदरम् हे तिरुचुझी येथे सामाजिक जीवनात एक आदरणीय मानले गेलेले वकील होते. या मधल्या मुलाचे नांव व्यंकटरमण असे ठेवले होते.
व्यंकटरमण यांचे सुरुवातीचे शिक्षण तिरुचुझी येथेच झाले. त्यांनी एक वर्ष दिंडिगल येथे पहिल्या इयत्तेत काढले व तदनंतर स्कॉटस् मिडल स्कूल येथे त्यांनी शिक्षण घेतले आणि नंतर मदुराई येथील अमेरिकन मिशन स्कूलमध्ये ते शिकले.
भौतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून काही विशेष आशादायक घटना घडल्याचे या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये दिसून आले नाही. शाळेतही ते त्यांच्या हुशारीबद्दल विशेषप्रकारे उल्लेखिले जात नव्हते. त्या काळच्या सर्वसाधारण तरुण माणसांच्या हिशेबाने त्यांच्या सुदृढ प्रकृतीपलीकडे त्यांच्यामध्ये खास करून काही विशेष आढळून आले नाही.
नोव्हेंबर 1895 मध्ये, त्यांच्या पूर्वायुष्यातील पहिली उल्लेखनीय घटना घडली. त्यांनी आपल्या एका नातेवाइकाला सहज विचारले, ‘‘आपण कोठे गेला होतात ?’’ त्याने म्हटले, ‘‘अरुणाचलम्ला’’…. आणि ह्या उत्तराचा महर्षींवर जादूसारखा परिणाम झाला. हे ठिकाण त्यांनी पूर्वी ऐकले होते. पण, यावेळेस मात्र त्यांना एक प्रकारची आदरयुक्त भीती व आनंद वाटून त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तरीही त्यांच्या हातात ‘पेरिअपुराणम्’ ची पोथी पडेपर्यंत हा एक निराळाच अनुभव आहे एवढेच वाटत होते. तमीळ संतांची ही चरित्रे त्यांच्यावर सखोल ठसा उमटवून गेली. पण तरीही हे अनुभवसुद्धा त्यांच्यावर दीर्घकाल परिणाम करू शकले नाहीत. बाह्यात्कारी ते सर्वसाधारण मुलासारखे जीवन व्यतीत करत होते. हे सर्व जुलै 1896 पर्यंत चालू होते. या सुमारास त्यांच्या जीवनात अचानक एक परिवर्तन घडून आले.