वयाच्या सतराव्या वर्षी महर्षींनी आपल्या स्वत:च्या मृत्यूचा अनुभव घेतला त्यावेळी त्यांना जो आत्मसाक्षात्कार झाला, ह्यासंबधी हकीकत त्यांच्याच शब्दात :

‘‘मदुरा कायमचे सोडण्यापूर्वी दीड महिन्याच्या अगोदर माझ्या आयुष्यातील एक क्रांतिकारक घटना अचानक घडली. मी चुलत्याच्या घरी पहिल्या मजल्यावर खोलीत एकटाच बसलो होतो. मी क्वचितच आजारी पडत असे व त्या दिवशी तर माझी तब्येत उत्तम असताना मनात एकदम मरणाची भीति उत्पन्न झाली. अशा भीतीला काहीच कारण दिसत नव्हते व असे कारण शोधण्याचा मी प्रयत्नहि केला नाही. मी मरणार असे मात्र मनाने घेतले ‘आता काय करावे?’ – असा विचार करू लागलो. डॉक्टरला, वडील माणसांना अगर मित्रांना वगैरे विचारावे असे सुचले नाही. ह्या प्रकरणाची सोडवणूक आताच्या आता आपल्या आपणच केली पाहिजे, असे मात्र मनात ठरवून टाकले.’’

‘‘मरणाच्या भीतीचा जो धक्का बसला, त्यामुळे माझे मन अंतर्मुख झाले. व मनातल्या मनात शब्द स्पष्ट झाल्याशिवाय म्हटले,‘‘मरण आले ह्याचा अर्थ काय? मरत कोण आहे? हे शरीर मरते आहे.’’ मग मेलेल्या मनुष्याप्रमाणे मी नाटक केले, पाय लांब केले, सर्व शरीर ताठ केले व प्रेतासारखे दिसावे म्हणून श्वास बंद करून ओठहि दाबून धरले, आणि एखादा शब्द बाहेर पडू नये याची खबरदारी घेतली. मी मनात म्हटले, ‘‘शरीर मेले, आता हे ताठ शरीर स्मशानात नेतील व तेथे ते जळून राख होईल. पण शरीर मेले म्हणून मी मेलो की काय? शरीरच मी आहे काय? हे तर जड आहे, पण मी माझे व्यक्तित्व व अस्तित्व पूर्णपणे अनुभवीत आहे व अंतर्यामी ‘मी’ अशा ध्वनीचा शरीरापासून वेगळा असा भास होत आहे. तेव्हा शरीरापासून निराळे चैतन्य हे माझे खरे स्वरूप आहे. शरीर मरणधर्मवान् आहे पण चैतन्याला मृत्यु शिवू शकत नाही. म्हणजे ‘मी’ अमरधर्मवान् असे चैतन्य होय. हे सर्व वार्‍यावरील विचार नव्हते, विचार केल्याशिवाय माझ्या मन:चक्षूंपुढे हे सत्य उभे राहिले! ‘मी’ ही अत्यंत सत्य वस्तु आहे व ह्या सत्य वस्तूच्या आधारावर शरीराचा सर्व व्यवहार चालत असतो असा विचार दृढ झाला. ह्या क्षणापासून पुढे ‘मी’ ही वृत्ति आत्म्यामध्येच बुडून गेली. आत्म्यामध्येच कायमचा व अखंड बुडून राहू लागलो. गाण्यात इतर स्वर येतात, जातात पण षड्ज कायमचा राहून इतर स्वरांना आधार देऊनहि त्या इतर स्वरात मिसळतो, त्याप्रमाणे ‘मी’ ची जाणीव व आधार शरीराच्या सर्व व्यापारात व इतर वेळीहि सर्वदा कायम राहू लागला. ह्या अनुभवाच्या पूर्वी मला आत्म्यासंबंधी काहीच कल्पना नव्हती व त्या दिशेने आकर्षणहि नव्हते. त्या आत्म्याविषयी विशेष प्रेम नव्हते व तेथेच कायमची बुडी मारून असावे असेहि कधी मनात आले नव्हते.’’

ह्या अनुभवामुळे महर्षींना विजेच्या लखलखाटाप्रमाणे आत्मसाक्षात्कार झाला. जेव्हा कर्माची फलप्राप्ती होण्याची वेळ आली तेव्हा उज्जवल अशा भूतकाळामुळे त्यांच्यामध्ये अगोदरच वासना स्वरूपात सुप्त होते ते त्यांच्या सत्यशोधाचे फळ, सहजासहजी जागृतावस्थेत येऊन त्यांना आनंद द्यावयास सिद्ध झाले.

अरुणाचलाचे पवित्र नाव अनपेक्षितपणे ऐकणे आणि त्यानंतरच्या मृत्यूच्या अंतर्यामीच्या प्रकाशाचा प्रवाह मोकळा व्हावा म्हणून घडविली गेलेली ती एक सूक्ष्म अशी क्लृप्ती होती. शरीराच्या आतील अवयवांनी संरक्षित केलेला, जीव-नाडीतील अत्यंत विशुद्ध असा, तो जाणिवेचा प्रवाह होता. स्थितीबद्दलचा जाणीवपूर्वक अनुभव घेणे, ही केवळ तात्कालिक आणि परिणामकारक कारणे होती. विजेच्या बल्बमधील सूक्ष्म तारेतून अतिसूक्ष्म प्रवाह निघतो तशा स्वरूपाचा तो प्रवाह होता. ते होते शरीरापासून शरीरातल्या आत्म्याचे विभक्त होणे !