अरुणाचलाचे महत्त्व

हिंदुस्थानात जी अत्यंत जुनी व यात्रेची पवित्र ठिकाणे आहेत त्यात अरुणाचल हे एक प्रमुख आहे. भगवान् म्हणत की, ‘‘हा आध्यात्मिक मध्य आहे.’’ शंकराचार्य ‘‘हाच मेरुपर्वत’’ असे सांगत. स्कंद पुराणात ‘‘हे शंकराचे केवळ हृदयच आहे व त्यामुळे त्याला अत्यंत पावित्र्य आहे,’’ असे लिहिले आहे. पुष्कळ साधुपुरुषांनी अरुणाचलावर वस्ती केलेली होती व अद्याप साधु व सिद्ध तेथे रहातात व ते पुष्कळांना शरीरधारी, अगर नुसत्या ज्योतिरूपाने दर्शन देतात.
पुराणात अरुणाचलाविषयी एक कथा आहे की, एकदा ब्रह्मा व विष्णु, आपणापैकी श्रेष्ठ कोण, म्हणून भांडू लागले. ह्या भांडणामुळे पृथ्वीवर गोंधळ माजला, तेव्हा देव शंकराला शरण गेले व त्यांनी हा तंटा मिटविण्याची विनंती केली. तेव्हा श्री शंकर ज्योतिरूपाने प्रगट झाले व ‘‘तुम्हांपैकी जो कोणी ज्योतीचे खालचे अगर वरचे टोक पाहील तो मोठा’’ अशी वाणी ज्योतीमधून निघाली. तेव्हा विष्णूने वराहरूप धारण करून पृथ्वी उकरण्यास सुरूवात केली व ब्रह्मा हंस होऊन वर उडत चालला. विष्णु खणता खणता विचार करीत राहिला व आपल्या हृदयात एक ज्योतिरूप पाहून समाधीत गेला, ब्रह्म्याने डोंगरावरील झाडाचे फूल पडताना पाहून व ते घेऊन ‘‘हे मी ज्योतिशिखेच्या टोकावरून आणले.’’ असे खोटेच सांगितले. विष्णूने आपला पराभव कबूल केला; व ईश्वराची प्रार्थनापूर्वक स्तुति करण्यास आरंभ केला. ‘‘तू ज्ञानस्वरूप ॐ आहेस, तूच सर्व वस्तूंचे आदि, मध्य व अंत आहेस. तूच सर्व असून, तू सर्वांना प्रकाशित करतोस.’’ तेव्हा शंकराने विष्णु मोठा असे ठरविले, ब्रह्मा खजील झाला व त्याने आपला खोटेपणा व अपराध कबूल केला. ह्या कथेतले विष्णु ‘अहंकार’, ब्रह्मा ‘मन’ व शंकर ‘आत्मा’ अथवा ‘ब्रह्म!’ ह्या कथेत पुढे असे सांगितले आहे की, लिंग अथवा ज्योतीचा प्रकाश अत्यंत तापदायक असल्यामुळे, शंकर, अरुणाचल डोंगराच्या रूपाने प्रगट झाले व म्हणाले, ‘‘सूर्याकडून जसा चंद्र प्रकाशित होत असतो, तशीच इतर सर्व तीर्थे अरुणाचलाकडून आपापले पावित्र्य धारण करीत रहातील; भक्तांवर उपकार करून त्यांना ज्ञान देण्याकरिता मी हे येथे असे रूप धारण केले आहे. अरुणाचलच ॐ आहे व दर वर्षी कार्तिकात ह्या डोंगरावर, शांति देणार्‍या ज्वालारूपाने माझे लोकांना दर्शन होत जाईल.’’ भगवान् नेहमी म्हणत की ‘‘प्रत्येकाला शेवटी अरुणाचलाकडे आलेच पाहिजे! ‘ज्ञानादेव तु कैवल्यम्’ (ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो.) अरुणाचल अद्वैत तत्त्वाचे प्रतीक आहे म्हणूनच तो सर्वश्रेष्ठ आहे.’’

श्री महर्षींच्या बालवयापासूनच ‘अरुणाचलम्’ शब्दाने त्यांच्यात आध्यात्मिक रोमांचकारी शिरशिरी निर्माण केली होती आणि त्यांचा भाऊ त्यांना जेव्हा रागावला तेव्हा त्यांना घरापेक्षाही त्या स्थानाचे महत्त्व जास्त वाटू लागले व त्यांनी सरळ अरुणाचलाचा रस्ता धरला. तेव्हापासून ते अरुणाचल येथे त्याच्या दक्षिणेकडील उतारावरील आश्रमात राहात असत.
अरुणाचलम्, दीपस्तंभासारखी उभी असलेली ही टेकडी कित्येक शतके हिंदुस्थानातील एक अतिपवित्र ठिकाण मानण्यात येते. ते तेजोलिंग आहे अशी लोकांची धारणा आहे. ही टेकडी अरुणगिरी या योगी सिद्धाचे वसतिस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. आणि आजही ते योगी तेथे राहात आहेत असे समजले जाते.
अरुणाचलम् ला ‘दक्षिणेकडील कैलास’ म्हटले जाते. दोनही कैलासांपैकी तो जास्त प्राचीन असावा. रूढी आणि भूस्तरशास्त्राचे पुरावे हेच दर्शवितात, की हे टेकडी हिमालय निर्माण होण्यापूर्वीपासून येथे आहे.
पॉल ब्रन्टनने त्याच्या ‘ए मेसेज फ्रॉम अरुणाचलम्’ ह्या पुस्तकात एका अमेरिकन भू-शास्त्रज्ञाने दिलेल्या स्पष्ट मताप्रमाणे अरुणाचलम् दगडी कोळशाचे थर निर्माण होण्यापूर्वीपासून बराच काळ तेथे आहे, असे म्हटले आहे.
प्रत्यक्षात त्याने हा अतिशय कठीण खडकाची पार्श्वभूमी असलेला प्रस्तराचा ढीग, आपल्या पृथ्वी ग्रहाचा वरचा थर तयार होण्याच्या, इतिहासाच्या सर्वांत आधीच्या काळातील असावा असे ठरविले आहे. ज्यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष राखले गेले आहेत. पृथ्वीवरील इतिहासपूर्वकालीन झाडीने झाकल्या गेलेल्या जंगलातून फिरत असलेल्या सरड्यासारख्या सरपटणार्‍या महाकाय प्राण्यांच्या बराच काळापूर्वी अरुणाचलम् अस्तित्वात होता. त्याने आणखी पुढे जाऊन सांगितले की, पृथ्वीचे कवच तयार झाले, अगदी त्याच काळी अरुणाचलम् निर्माण झाला. जेथे सध्या हिंदीमहासागर आहे, तेथील खंडप्राय देश पाण्याखाली जाऊन दिसेनासा झाला. त्याचा अरुणाचलम् हा खरा म्हणजे शिल्लक राहिलेला वरचा भाग आहे.’’
‘‘अरुणाचलम् हे सर्व पवित्र ठिकाणांमधील अत्यंत पवित्र स्थान असून ते जणू जगाचे हृदय आहे.’’ असे स्कंद पुराण सांगते.
आणि शिव म्हणाले,
‘‘प्रत्यक्षात अग्नितत्त्वाची असूनही या टेकडीचे जे निस्तेज दर्शन घडते, ते जगाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी असणार्‍या प्रेमळ तळमळीचे आणि कृपेचे द्योतक आहे. येथे मी परिपूर्ण स्वरूपात आहे. तर मग असे ध्यान कर की ह्या पर्वताच्या हृदयातून उसळणार्‍या आत्मिक तेजामध्ये सारे जग सामावले आहे.’’
अरुणाचलाला प्रदक्षिणा करण्यास भगवान् सर्वांना सांगत असत. ‘‘म्हातारे व शक्तिहीन असाल, तर सावकाश जा, पण जाच.’’ कार्तिकात व माघ शिवरात्रीला पुष्कळच यात्रा जमते व त्या वेळी यात्रेकरू प्रदक्षिणा करीत असताना, अरुणाचलाला एक फुलांचा हार घातला आहे की काय असा भास होतो.