भगवानांच्या शिकवणीचा त्यांच्या स्वत:च्या शब्दात असलेला सर्वांत पहिला उपदेश हा ‘मी कोण?’ व ‘आत्म-विचारणा’ ह्या दोहोंच्या एकत्रित संचामध्ये येतो. त्यांचे शब्द अत्यंत सुस्पष्टपणे त्यांची प्रमुख व मध्यवर्ती शिकवण व्यक्त करतात, की, मोक्षाच्या अथवा मुक्तीच्या प्राप्तीसाठी असणारा थेट व प्रत्यक्ष मार्ग म्हणजे आत्म-विचारणा हाच होय. आणि त्याची नेमकी व विवक्षित पद्धत अत्यंत सुबोधपणे व्यक्त करण्यात आलेली आहे.

अद्वैत वेदान्त

ह्या शिकवणीचा मूळ पाया अद्वैत-वेदान्त हाच आहे. आत्म्याच्या अ-द्वैतपणाची संपूर्णतया अनुभूती घेणे हेच ध्येय आहे; आणि त्यासाठी आपल्या स्वत:च्या प्रवृत्तींमध्ये, स्व-भावामध्ये शोध-विचारणा करत त्या आत्म्याच्या दिशेने जाणे हा मार्ग आहे. मन जेव्हां आत्मन् चे अन्-आत्मन् (शरीर इ. ) बरोबर एकरूपत्व करते, तेव्हां तेथे बंध निर्माण होतो; आणि जेव्हां ‘मी कोण?’ ह्या आत्म-शोध-विचारणेद्वारे ते चुकीचे एकरूपत्व दूर केले जाते तेव्हां बंध-मुक्ती होते. आणि म्हणून, आत्म-विचारणेचा हा भगवानांनी सांगितलेला मार्ग थेट व प्रत्यक्ष स्वरूपाचा मार्ग आहे.

Who Am I?
Click to Download

मी कोण ?

‘मी कोण आहे?’ मी म्हणजे हे भौतिक शरीर नव्हे, किंवा संवेदनांची जाणीव करून देणारी पंचेंद्रिये (डोळा, कान, नाक, जीभ व त्वचा ही इंद्रिये, त्यांच्याशी क्रमशः निगडित असणार्‍या दृष्टी, श्रवण, गंध, चव व स्पर्श ह्या कार्यांसह) म्हणजे देखील मी नव्हे, बाह्य क्रिया करणारी पंचकर्मेंद्रिये (शब्दांचा उच्चार करणारी व ध्वनी उत्पन्न करणारी वाणीसंबंधीची इंद्रिये, तसेच भौतिक शरीराच्या हालचालींचे संचलन करणारे हात व पाय, मल विसर्जित करणारे गुदद्वार, आणि सुखोपभोग उत्पन्न करणारे लैंगिक अवयव) म्हणजे मी नव्हे, प्राणशक्तीचे पाच प्रवाह (जे श्वासोच्छ्वास करणे, अन्न पचवणे व जिरवणे, रक्त प्रवाहित करणे, घाम येणे, मलविसर्जन करणे यांना नियंत्रित करतात) म्हणजे सुद्धा मी नव्हे, इतकेच काय, विचारशील मन म्हणजे देखील मी नव्हे. ज्यावेळी व्यक्ती ज्ञानेंद्रियांच्या संवेदनांमुळे निर्माण होणार्‍या क्रिया-प्रक्रिया, तसेच मनाच्या क्रिया-प्रक्रिया यांच्यापासून मुक्त असते, शिवाय, ज्यावेळी व्यक्तीला संवेदनांमार्फत ज्यांचे ज्ञान ग्रहण होते त्या संवेदनाग्राह्य विषयांच्या अस्तित्वाविषयी देखील जाणीव राहिलेली नसते, त्यावेळची ती जी नेणिवेची अचेतन अवस्था असते, की ज्या अवस्थेमध्ये मनाच्या सुप्त वासना सूक्ष्म व तरल स्वरूपात फक्त जतन करून ठेवल्या जातात, अशी स्थिती म्हणजे देखील मी नव्हे.

त्यामुळे, वर उल्लेखिलेल्या सगळ्या भौतिक स्वरूपाच्या गोष्टी व त्यांचे व्यवहार यांचा एकंदरीतपणे समग्र त्याग करणे, असे म्हणत म्हणत, की ‘मी म्हणजे हे नव्हे : नाही, मी हे नाही, मी हे देखील नाही’ – आणि त्यानंतर मग, ते जे ह्या सगळ्याकडून वेगळे, भिन्न, आणि त्याचे ते स्वतंत्र व एकटेच, असे जे उरते, ती जी विशुद्ध स्वरूपातल्या अस्तित्वाची जाणीव असते, ते म्हणजे, मी म्हणून जे कांही आहे, ते असते. हा विशुद्ध स्वरूपातली जाणीव असणारा मी, हा त्याच्या प्रत्यक्ष स्वभावगुणधर्मानुसार सत्-चित्-आनंदस्वरूप असतो, अस्तित्व-चैतन्य-आनंद असतो.
जर मन, की जे ज्ञानप्राप्तीचे साधन व माध्यम असून सर्व क्रिया-व्यवहाराचा मूलभूत आधार असते, ते मन जर गप्प झाले, अकार्यशील झाले, शांत झाले, तर, जग म्हणजे एक वास्तव सत्य आहे, अशी जी त्या मनाला जगासंबंधी जाणीव होत असते, ती जाणीव, ते आकलन देखील संपुष्टात येईल, नाहीसे होईल. दोरीमध्ये साप असल्याची काल्पनिक जाणीव जोपर्यंत संपून जात नाही, तोपर्यंत, ज्या दोरीच्या ठिकाणी हा भ्रम आकाराला आलेला असतो, त्या दोरीसंबंधीचे यथायोग्य आकलन होऊ शकत नाही. (संधिप्रकाशामध्ये एक माणूस दोरी पाहून ती साप आहे असे समजतो आणि त्यामुळे कारण नसताना घाबरतो, ह्या पारंपरिक गोष्टीवर हे साम्य आधारित आहे) त्याचप्रमाणे, जग हे एक वास्तव सत्य आहे असे जगासंबंधीचे भ्रामक स्वरूपाचे आकलन जोपर्यंत संपून जात नाही, तोपर्यंत, ज्या दिव्य अंतर्ज्ञानाच्या जागी त्या भ्रमाने आकार घेतलेला असतो ते, आत्म्याच्या खर्‍या स्वरूपासंबंधीचे दिव्य अंतर्ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही.

मन ही आत्म्याच्या ठिकाणी असणारी एक विलक्षण व वैशिष्ट्यपूर्ण शक्ती आहे, की जिच्यामुळे व्यक्तीच्या ठिकाणी विचार उत्पन्न होत असतात. अशी जर चौकशी केली, की सगळेच्या सगळे विचार वगळून टाकल्यानंतर काय उरते, तर त्या छाननीमधून असे आढळून येईल, की मन अशी विचाराहून भिन्न असणारी कोणतीही गोष्ट नाही आहे. म्हणजे, याचा अर्थ, प्रत्यक्ष विचार हेच मनाची संरचना करणारे घटक होत.
त्याचप्रमाणे, विचाराहून वेगळी व भिन्न असणारी, विचाराहून पूर्णपणे स्वतंत्र असणारी अशी, भौतिक जग ह्या प्रकारची देखील कोणतीही गोष्ट नसते. सुषुप्तीच्या सखोल निद्रेमध्ये कोणतेही विचार नसतात : त्यावेळी, ते जग देखील नसते. जागेपणीच्या व स्वप्नाच्या अवस्थांमध्ये विचार उपस्थित असतात, आणि त्यावेळी ते जग देखील उपस्थित असते. ज्याप्रमाणे एखादा कोळी आपल्या स्वतःच्या आतमधून कोळिष्टकाचा धागा बाहेर काढतो आणि त्या धाग्याला पुन्हा आपल्या आतमध्ये खेचून घेतो, अगदी तसेच, मन आपल्या स्वतःच्या आतमधून जगाचा आराखडा प्रक्षेपित करत असते आणि ते मन आपल्या आतमध्ये जगाला माघारी शोषून घेत असते.
मन जेव्हां बहिर्मुख झालेले असते, अर्थात् मनाचे विचार जेव्हां बाहेरच्या दिशेने धावणारे असतात, तेव्हां मनाला, हे जग एक भौतिक स्वरूपातले वास्तव आहे, अशी जगासंबंधी बाह्यतः किंवा वरवरची जाणीव होत असते, आणि त्यामुळे ते मन त्यावेळी त्याचा आत्म्याशी असणारा एकत्वाचा संबंध सोडून देत असते. जगाविषयी जेव्हां अशाप्रकारे आकलन होते, तेव्हां आत्म्याचा खरा स्वभावधर्म प्रकट होऊन समोर येत नाही ः त्याच्या उलट, जेव्हां आत्म्याचा बोध झालेला असतो, तेव्हा जग हे एक वास्तव सत्य आहे असे जगासंबंधी वाटणे संपुष्टात आलेले असते.

जर सतत, अखंडितपणे, मनाचे स्वरूप व प्रवृत्ती यांच्या आतमध्ये शिरून सखोल, बारकाईने व पद्धतशीरपणे निरीक्षण व तपास करत शोध घेतला, तर त्या मनामध्ये बदल पडेल आणि ज्याचा ‘मी’ ने निर्देश केला जातो त्या ‘त्या’च्यामध्ये त्या मनाचे परिवर्तन होईल आणि ते म्हणजे खरोखर आत्मा हेच होय. मनाला त्याच्या अस्तित्वासाठी त्याने एखाद्या ठोस गोष्टीवर अवलंबून राहणे हे गरजेचे असते, ते कधीही त्याचे ते अस्तित्वात राहू शकत नाही. ते हेच मन असते, ज्याला एरवी सूक्ष्म देह, अहंकार, जीव किंवा आत्मा असे म्हटले जाते.

भौतिक शरीरामध्ये ‘मी’ म्हणून जे उत्पन्न होत असते ते म्हणजे मन होय. शरीरामधला ‘मी’ हा विचार अगदी पहिल्या प्रथम, मुळातून कोठून उत्पन्न होतो, याचा जर व्यक्तीने शोध घेत, चौकशी करत, तपास लावत परीक्षण केले, तर असे आढळून येईल, की तो हृदयामधून (‘हृदयम्’ ह्या शब्दामध्ये दोन अवयव आहेत, ‘हृद्’ म्हणजे केंद्र व ‘अयम्’ म्हणजे हे, ज्यावरून, ‘मी म्हणजेच हृदय’ हा अर्थ ध्वनित होतो) असतो. हृदय हेच मनाचे मुळातले उगमस्थान असून तेच त्याचे निवासस्थान असते. किंवा असे की, एखाद्याने जरी फक्त, आपले संपूर्ण मन ‘मी-मी’ ह्यावर केंद्रित करून आपल्या आतल्या दिशेने ‘मी-मी’ ह्याचा स्वतःशी सातत्याने पुनरूच्चार केला, तर तसे करणे देखील त्याला त्याच उगमाकडे घेऊन जाईल.

आत्मविचारणा

‘मी’ ची जाणीव सगळ्या व्यक्तींच्या बाबतीत अगदी नैसर्गिकच नव्हे का, जी व्यक्तीद्वारे तिच्या सगळ्या भावना इत्यादींपासून ‘मी आलो’, ‘मी गेलो’, ‘मी केले’, ‘मी होतो’ अशा प्रकारे व्यक्त करण्यात येते ती? ‘हे काय आहे?’ असा प्रश्न विचारला असता, आपल्याला असे आढळून येते, की शरीराचे ‘मी’शी एकत्व झालेले असते, कारण व्यक्तीच्या हालचाली व तत्सम अनेक क्रिया शरीराशी निगडित असतात. तर मग, ही ‘मी’ची ंजाणीव म्हणजे शरीर असू शकते का? शरीर जन्मापूर्वी अस्तित्वात नव्हते, ते पंचमहाभूतांपासून बनलेले असते, झोपेमध्ये शरीराचे अस्तित्व नसते, (म्हणजे, ते जाणिवेमध्ये असत नाही), आणि सरतेशेवटी ते शव बनते. नाही, ‘मी’ ची जाणीव म्हणजे शरीर असू शकत नाही. जी जाणीव ह्या आत्ताच्या तात्पुरत्या काळापुरतीच शरीरामध्ये उत्पन्न होत असते, त्या जाणिवेलाच एरवी अहंपणा, अहंकार, अज्ञान, भ्रम, अशुद्धपणा, व्यक्तिगत अस्तित्व किंवा जीवात्मा असे म्हटले जाते. ‘मी कोण?’ ह्याचा शोध घेत (आत्म्यामध्ये प्र्रवेश करणे) हाच सर्व धर्मग्रंथांचा हेतू असतो. त्या ग्रंथांमध्ये हे जाहीरपणे प्रकट करण्यात आलेले असते, की अहंकाराची जाणीव संपूर्णपणे नष्ट झालेली असणे म्हणजेच स्वतंत्रता किंवा मुक्ती होय. तर मग, ह्या शिकवणुकीपासून कोणीही अलिप्त कसे राहू शकते? शरीर, जे लाकडाच्या ओंडक्यासारखे निर्जीव असते, ते त्याचे ते, ‘मी’ म्हणून प्रकाशमान होऊन कार्यप्रवण होऊ शकते का? नाही. म्हणूनच, ह्या निर्जीव शरीराला, ते खरोखरच एखादे शव असावे अशा प्रकारे बाजूला ठेवा, वगळून टाका. त्या शरीराच्या बाबतीत, ‘मी’ असे साधे पुटपुटू सुद्धा नका, मात्र, स्वत:च्या आतमध्ये शिरून अत्यंत बारकाईने तपास करत जा, चौकशी करा, परीक्षण करा, की आतल्या गाभार्‍यात, हृदयामध्ये, आता ‘मी’ म्हणून जे तळपते आहे, ते काय आहे? अथकपणे चालू असणार्‍या, अनेकविध प्रकारच्या विचारांच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला, हृदयामधून, एक अखंड व अविरतपणे असणारी, शांत व उत्स्फूर्त अशी ‘मी-मी’ ची जाणीव वर उठत असते. जर व्यक्तीने तिची पकड घेतली आणि शांत राहिले, तर त्या व्यक्तीची शरीरामधली ‘मी’ ची जाणीव संपूर्णपणे नाहीशी होईल आणि ती तिची तिचीच अदृश्य होईल, जळणार्‍या कापराचा अग्नी विझून जावा तशी. विद्वान् साधू व धर्मग्रंथ हे ह्यालाच मुक्ती असे प्रकटपणे मान्य करतात.

अज्ञानाचे आवरण आत्म्याला कधीच पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. कसे झाकू शकेल? जे अज्ञानी असतात, त्यांना सुद्धा ‘मी’ असे म्हणणे चुकत नाही. अज्ञानाचे आवरण जे असते ते ‘मी म्हणजेच आत्मा’ किंवा ‘मी म्हणजेच विशुद्ध चैतन्य’ ह्या खर्‍याखुर्‍या सत्याला फक्त लपवून ठेवत असते, आणि ‘मी’ ला शरीर समजण्याची ते चूक करत असते.

आत्मा हा स्वयं-प्रकाशी असतो. कोणीही कोणत्याही प्रकारे त्याचे मानसिक चित्र रेखाटण्याची किंवा त्याला मनाच्या साह्याने आकार देण्याची गरज नाही. अशी कल्पना करणारा जो विचार असतो, तो विचार हेच एक बंधन असते, मर्यादा असते, कारण आत्मा हे असे दिव्य तेज आहे जे अंधार व उजेड ह्या दोहोंच्याही पलीकडचे असते; त्यामुळे, त्याच्याविषयी कोणीही मनाच्या साह्याने विचार करू नये. तशा प्रकारची कल्पना करण्याचा शेवट बंधनात किंवा मर्यादेमध्ये होईल, मात्र प्रत्यक्षात, आत्मा हा एकमेवाद्वितीय विशुद्ध चैतन्य म्हणून स्वयंस्फूर्तपणे प्रकाशमान होत असतो. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी श्रद्धापूर्वक ध्यान करत, पद्धतशीरपणे शोध-तपास-परीक्षण करत आत्म्याच्या आतमध्ये शिरण्याची ही जी विचारणा असते, त्यामधून अशी अवस्था उदयाला येते, की जिच्यामध्ये मन हे आत्म्याच्या ठिकाणी शोषले जाऊ लागते, विरघळले जाऊ लागते, मनाचा आत्म्यामध्ये विलय होऊ लागतो, आणि ती अवस्था त्या मार्गावरून पुढच्या अवस्थेकडे घेऊन जाते, जी असते मुक्तीची आणि निर्गुणनिराकार दिव्यानंदाची. अनेक थोर साधूंनी असे स्पष्टपणे सांगितलेले आहे, की केवळ आत्म्याच्या दिशेने श्रद्धापूर्वक विचारणा करण्याच्या साह्यानेच मुक्ती प्राप्त करून घेता येऊ शकते. ‘मी’च्या विचाराच्या रूपात असणारा अहंकार हेच त्या भ्रमाच्या वृक्षाचे मूळ असल्यामुळे, त्या ‘मी’पणाचा विनाश करण्याने भ्रम उन्मळून पडतो, जसे मुळे छाटून टाकल्यामुळे झाड उन्मळून पडते, अगदी तसेच. ही जी अहंकाराला संपूर्णपणे नष्ट करून टाकण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे, केवळ त्याच पद्धतीला भक्ती, ज्ञान, योग किंवा ध्यान म्हणणे उचित ठरेल, योग्य ठरेल.

‘‘मी म्हणजे शरीर’’ ह्या जाणिवेमध्ये, पंचकोषांनी (अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय) तयार झालेल्या देहांपैकी तीन देह (जागृती, स्वप्न व सुषुप्ती ह्या अवस्थांचे अनुक्रमे, स्थूल, सूक्ष्म व कारण देह) अंतर्भूत असतात. जर त्या तीन देहांच्या संबंधीची जाणीव काढून टाकली गेली, तर इतर देहांच्या संबंधीची जाणीव देखील आपोआप गळून पडेल; कारण इतर देह हे त्या तीन देहांवर अवलंबून असतात. इतर देहांची जाणीव काढून टाकण्याची क्रिया वेगळी, स्वतंत्रपणे करण्याची आवश्यकता नाही, कारण धर्मग्रंथ असे म्हणतात, की केवळ विचार हेच बंधन असते. त्यांची अंतिम निष्पत्ती अशी आहे, की सर्वांत उत्तम पद्धत म्हणजे, ‘मी’ पणाचे विचार ह्या स्वरूपात असणार्‍या मनाला ‘‘त्या’’च्या पाशी, (त्या ब्रह्मन्पाशी) समर्पित करा, आणि नित्य अविचल स्थिरपणा राखत, ‘‘त्या’’ला, त्या ब्रह्मन्ला कधीही विसरू नका