‘अरुणाचलपञ्चरत्नम्’ ही पंचश्लोकी महर्षींनी स्वतः संस्कृतमध्ये रचलेली आहे. अरुणाचल पर्वत हाच परमात्मा असून सर्व विश्वाला ज्ञान देणारा सूर्य आहे असे सांगून, त्याने आपल्या सर्वांच्या हृदयाला विकसित करावे असे आवाहन करणारी प्रार्थना येथे आहे. त्यानंतर मग, व्यक्तीचे हृदय, आत्मविचारणा, व्यक्तीचा समर्पणभाव, आत्मिक पातळीवरची भक्ती, व्यक्तीला येणारी विस्तीर्णपणाची अनुभूती, दिव्यानंदाची प्राप्ती यासारख्या गोष्टी ह्या पाच श्लोकांमध्ये येतात. त्यामुळे असे वाटते, की जणूं कांही सगळ्या ब्रह्मविद्येचे सार ह्या पंचश्लोकीमध्ये आलेले आहे.

करुणापूर्णसुधाब्धे

कवलितघनविश्वरूपकिरणावल्या।

अरुणाचलपरमात्मन्

अरुणो भव चित्तकञ्जसुविकासाय॥1॥

जो अतिशय दयापूर्ण आहे, अमृताचा सागर आहे, आपल्या असंख्य किरणांच्या तेजाने, ज्याने सार्‍या विश्वाला आपल्या कवेत घेतलेले आहे, अशा हे परमात्म्या अरुणाचला, तू आमच्या हृदयरूपी कमळाला विकसित करणारा सूर्य हो.

त्वय्यरुणाचल सर्वम्

भूत्वा स्थित्वा प्रलीनमेतच्चित्रम्।

हृद्यहमित्यात्मतया

नृत्यसि भोस्ते वदन्ति हृदयं नाम॥2॥

Arunachala with Green Foliage

हे अरुणाचला, ह्या विश्वाचे संपूर्ण चित्र तुझ्याच ठिकाणी निर्माण होते, त्यानंतर ते तुझ्याच ठिकाणी राहते आणि मग तुझ्यामध्येच विलीन होते. ‘हृद्’ म्हणजे कोणत्याही गोष्टीचा मूळ गाभा, अंतरंग, मूलभूत रहस्य, सारांश, तत्त्वस्वरूप सत्य ज्ञान होय. ‘हृदि’ म्हणजे अशा त्या हृद्च्या ठिकाणी. ‘अहम्’ म्हणजे मी. ‘हृदि अहम् इति आत्मतया’ म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या अंतरंगातले त्या गोष्टीचे सारभूत तत्त्व म्हणून जे मीपणाचे तत्त्व असते तेथे. तेथे, हे अरुणाचला, तू ‘आत्मतया नृत्यसि’, तेथे, हे अरुणाचला, त्या प्रत्येक गोष्टीचा आत्मा म्हणून तू नर्तन करत असतोस. अर्थात्, हे परमात्मास्वरूपी अरुणाचला, ह्या विश्वामधील प्रत्येक गोष्टीच्या हृदयामध्ये तू त्यांचा आत्मा होऊन स्थायी स्वरूपात निवास करत असतोस नि त्याचवेळी प्रवाही स्वरूपात गतिशील होऊन कार्य करत असतोस. आणि म्हणून तुला ‘हृद् अयम्’ अर्थात् ‘हेच अंतःस्थ सत्यतत्त्व’ ह्या अर्थाने ‘हृदय’ असे म्हटले जाते.

अहमिति कुत आयाति

इत्यन्विष्यान्त:प्रविष्टयाऽत्यमलधिया।

अवगम्य स्वं रूपम्

शाम्यत्यरुणाचल त्वयि नदीवाब्धौ॥3॥

अतिशय विशुद्ध व निर्मळ बुद्धीने स्वतःच्या आतमध्ये प्रवेश करून, जी व्यक्ती ‘हा जो मी आहे, तो कोठून येतो ?’ अशी विचारणा करत शोध घेत जाते, त्या व्यक्तीला आपल्या सत्यस्वरूप आत्मतत्त्वाचे ज्ञान होते आणि मग त्यानंतर, हे अरुणाचला, नदी जशी समुद्राला मिळाल्यानंतर शांत होते, तसे त्या व्यक्तीचे तुझ्या ठिकाणी शमन होते.

त्यक्त्वा विषयं बाह्यम्

रुद्धप्राणेन रुद्धमनसाऽन्तस्त्वाम्।

ध्यायन्पश्यति योगी

दीधितिमरुणाचल त्वयि महीयं ते॥4॥

बाह्य विषयांचा त्याग करून, ज्यांच्यावर ताबा मिळविलेला आहे अशा आपल्या प्राण व मन यांच्या साह्याने, जो आपल्या आतमध्ये प्रवेश करतो, त्या अशाप्रकारे ध्यान करणार्‍या योग्याला दिव्य तेजाचे दर्शन होते आणि मग, हे अरुणाचला, त्याला तुझ्या ठिकाणी स्वतःच्या विस्तीर्णपणाची अनुभूती येते.

त्वय्यर्पितमनसा त्वाम्

पश्यन्सर्वं तवाकृतितया सततम्।

भजतेऽनन्यप्रीत्या

स जयत्यरुणाचल त्वयि सुखे मग्न:॥5॥

Arunachala Full Moon

जी व्यक्ती, तुझ्या ठिकाणी आपले मन अर्पण करून, तुझ्याकडे पाहात असताना, हे सर्व विश्व म्हणजेच तुझी आकृती आहे, अशारीतीने नेहमी पाहते, आणि जी अनन्य प्रेमाने तुझी भक्ती करते, ती व्यक्ती, तिच्या आत्मतत्त्वाचा शोध व बोध याबाबतीत यशस्वी होते, आणि हे अरुणाचला, ती तुझ्या ठिकाणी दिव्य आनंदाच्या सुखामध्ये रममाण होते.

इति श्रीपाराशर्यस्य भगवतो ब्रह्मर्षेराचार्यरमणस्य दर्शनं अरुणाचलपञ्चरत्नम्।

असे हे पराशर कुळामधील ब्रह्मर्षी भगवान् रमणाचार्य ह्यांना दर्शन झालेले ‘अरुणाचलपञ्चरत्नम्’ होय.